धाराशिव : जवळा (खुर्द), ता. कळंब येथील हातलाई शुगर प्रा. लिमिटेड या कारखान्यात चालू गळीत हंगामातील पहिल्या जॉगरी पावडर, म्हणजेच गूळ पावडरच्या पहिल्या पोत्याचे पूजन मंगळवारी उत्साहात पार पडले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा संघटक सुधीर (अण्णा) पाटील तसेच कारखान्याचे चेअरमन, युवा उद्योजक व शिवसेना युवा नेते अभिराम सुधीर पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष सुधीर पाटील म्हणाले, “परिसरातील शेतकऱ्यांना ऊसाचा रास्त व न्याय्य दर मिळावा, यासाठी कारखाना कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य मोबदला देणे ही आमची प्रथम जबाबदारी आहे.” त्यांनी ऊस उत्पादकांना दिलासा देणारे आश्वासन देत कारखान्याच्या प्रामाणिक भूमिका स्पष्ट केल्या.
कारखान्याचे चेअरमन अभिराम पाटील यांनी सांगितले की, “हातलाई शुगरच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती अधिक वेगाने होईल. कारखाना आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शक व्यवहार आणि शेतकरीहिताची भुमिका जपत कार्य करेल.”
कार्यक्रमाला अमोल शेळके, साहेबराव देशमुख, किसन हजारे, इस्माईल शेख तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर रोंगे साहेब, चिफ केमिस्ट फुलचंद शेळके, चिफ मॅनेजर मुंडे साहेब, विनोद पुजारी, क्षीरसागर, गायकवाड यांसह अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

