तुळजापूर : आगामी मराठी चित्रपट “फायटर” मध्ये तिर्थक्षेत्र तुळजापूरचा अभिमान वाढवणारी बालकलाकार श्रुती राजेश चोपदार हिची महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवड झाली असून, सिनेसृष्टीतला तिचा हा पहिला मोठा टप्पा मानला जात आहे.
सिनेमॅटिक स्टुडिओ, धाराशिव यांच्या निर्मितीखाली दिग्दर्शक मनोज अंकुशराव शिंदे आणि निर्माते अमरदीप महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली तयार होणाऱ्या “फायटर” चित्रपटासाठी अलीकडेच ऑडिशन पार पडले. मराठवाड्यातील होतकरू कलाकारांसाठी ही सुवर्णसंधी ठरली.
या ऑडिशनमध्ये आपल्या नैसर्गिक अभिनयाने चमक दाखवत श्रुती चोपदारने परीक्षकांची मनं जिंकली. तिच्या संवादफेकीतील आत्मविश्वास, भावनांची अचूक अभिव्यक्ती आणि कॅमेरासमोरील सहज वावर पाहून तिला चित्रपटातील एक महत्त्वपूर्ण भूमिका देण्यात आली आहे.
श्रुतीच्या निवडीमुळे तुळजापूरमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कुटुंबीयांनी व शिक्षकांनी तिच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.


