धाराशिव : एकादशी निमित्त मारवाडी गल्ली येथे भक्तिभावाने आयोजित करण्यात आलेला सामूहिक गीता पठण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी श्री पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन सौ. दमयंती वाकुरे, संतोष डिग्गीकर, सुभाष पाटील व अनिता सरदेशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर उपस्थित असलेल्या १५० हून अधिक महिला व पुरुष भाविकांनी एका सुरात अस्खलित संस्कृतमध्ये श्री भगवद्गीतेचे सातशे श्लोक, तसेच श्री विष्णुसहस्त्रनाम, श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि श्री शंकराचार्य विरचित पांडुरंगाष्टक स्तोत्र यांचे पठण श्रद्धा व भक्तिभावाने केले.
कार्यक्रमात बोलताना श्यामराव दहिटणकर म्हणाले, “या गीता पठणातील सातत्य, उत्साह आणि शिस्त पाहून असे वाटते की हा फक्त एकादशीचा कार्यक्रम नसून खऱ्या अर्थाने एक गीता पठण सोहळा आहे. भगवंताच्या कृपेने व सर्वांच्या सहकार्याने दर पंधरवड्याला बालाजी मंदिरात हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरत आहे.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डी.आर. कुलकर्णी, अभिजीत कदम, नंदकुमार ठाकरे, भास्कर पाटील, विश्वंभर महाजन, बी. एन. कुलकर्णी, तसेच मनीषा गोवर्धन, शीला पाठक, अहिल्या कदम, मंगल सराफ, उषा शिंदे यांसह अनेक महिला व पुरुष भाविकांनी परिश्रम घेतले.
शेवटी आरती व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. एकादशीच्या निमित्ताने दमयंती वाकुरे, संतोष डिग्गीकर, अनिता सरदेशमुख, उर्मिला डिग्गीकर व सुभाष पाटील यांनी भाविकांना फराळाचे वितरण केले.

