धाराशिव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारीच्या चर्चांना वेग आला असून, या निवडणुकीत नवख्या “स्वप्नाळू” कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. अनेकांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून स्वतःची उमेदवारी जाहीर करत प्रचाराची बिगुल वाजवली आहे. दुसरीकडे, निष्ठावंत जुने कार्यकर्ते मात्र बंद दरवाजाआड उमेदवारी मिळविण्यासाठी हालचाली करताना दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांत अनेक तरुणांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. गेल्या दोन-चार वर्षांत पक्षांत दाखल झालेले हे नवखे आता सरळ उमेदवार होण्यासाठी पुढे सरसावले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांवरून ‘जनतेचा सेवक’, ‘आपला माणूस’, ‘लवकरच भेटू मैदानात’ अशा पोस्ट आणि व्हिडिओंद्वारे त्यांनी समाज माध्यमावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काहींनी तर बॅनर आणि जाहिराती तयार करून क्षेत्रात प्रचार मोहीमही सुरू केली आहे.
नवख्यांचा हा जोश पाहता राजकीय वातावरणात नवे समीकरण तयार होताना दिसत आहे. जनतेशी थेट संपर्क साधणारे हे तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत. परंतु, या नवख्या लाटेमुळे पक्षातील जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत. अनेकांनी दशकेभर पक्षासाठी झटले, निवडणुकांमध्ये काम केले, तरीही त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे.
जुन्या कार्यकर्त्यांचा एक गट मात्र सध्या शांतपणे ‘बॅकडोअर फिल्डिंग’ लावत आहे. काही ठिकाणी पक्षातील वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रभावशाली कार्यकर्त्यांमार्फत बंद दरवाजाआड उमेदवारी ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “काही जागांवर उमेदवारी फिक्स झाली आहे” अशी चर्चा पक्षांच्या कार्यकर्त्यांत जोरात आहे.
या साऱ्या प्रक्रियेत भारतीय जनता पक्ष सर्वाधिक सक्रिय दिसत आहे. भाजपमध्ये उमेदवारी फिक्स करण्याची चर्चा सर्वाधिक रंगात आहे. अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी आणि मतभेद उफाळले आहेत. काही ठिकाणी दोन ते तीन कार्यकर्त्यांनी एकाच विभागातून उमेदवारीची तयारी केली असून, यामुळे पक्षांतर्गत संघर्षाची शक्यता वाढली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार) आणि शिवसेना (उबाठा व शिंदे) गटांतही अशीच स्थिती दिसत आहे.
याउलट काही अनुभवी आणि जुने कार्यकर्ते मात्र सध्याच्या घडामोडींकडे शांतपणे पाहत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, “उत्साह चांगला असतो, पण निवडणूक लढविण्यासाठी समाजातील काम, संपर्क आणि पक्षाशी दीर्घकालीन नातं महत्त्वाचं असतं.” काही ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी नवख्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तर काही ठिकाणी तरुणांनी जुन्यांना बाजूला सारण्याचे संकेत दिले आहेत.
निवडणुका स्थानिक असल्या तरी त्यांचा रंग राज्यभर गडद झाला आहे. प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. नवख्या उत्साही कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव या दोघांच्या संघर्षातूनच पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.
आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. त्याआधीच सोशल मीडियावर ‘मीच उमेदवार’ अशी स्पर्धा सुरू झाली आहे. आता पाहायचे एवढेच की, पक्ष खऱ्या निष्ठावंतांना प्राधान्य देतो की समाजमाध्यमावर चमकणाऱ्यांना तिकीट देतो? सध्या मात्र प्रत्येक गावात, गल्लीबोळात आणि चहाच्या टपरीवर एकच चर्चा रंगली आहे,
“कोणाची उमेदवारी फिक्स?”

