कधी कधी जीवनात असे काही क्षण येतात की मन नकळत थांबतं, विचारांना उभारी येते आणि आपल्याला जाणवतं— माणुसकी अजूनही जिवंत आहे, अजूनही श्वास घेते, अजूनही कुणाच्या संकटात हात देण्यासाठी पुढे येते. कालचा प्रसंग तसाच होता…

संध्याकाळी माझ्या गाव कुंभारीवरून फोन आला. चिंचोली गावातून एक गर्भवती महिला प्रसूतीसाठी आलेली, सोबत कुणीच नाही— फक्त एक वयस्कर आजी. परिस्थिती गुंतागुंतीची, डॉक्टरांनी सांगितले की सिझर होऊ शकतो, आणि त्यासाठी सोलापूरला जाण्याचाही सल्ला देत होते. त्या आजीला काहीच समजत नव्हतं— कागदपत्रं कशी करायची, निर्णय कोण घ्यायचा, कुठे जायचं… आणि अशा अनिश्चिततेच्या क्षणी त्यांचा हात धरायला कुणीच नव्हते.

मनात खूप विचार आले, पण एकच भावना ठाम होती— कुणाचं तरी संकट आहे, आणि मी मदत करू शकतो.
रात्र जरी झाली होती तरी मी लगेच निघालो. दवाखान्यात पोहोचल्यावर आजींचा चेहरा पाहिला… डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर चिंता, आणि मनात हतबलता. पण त्याच क्षणी एक निर्णय घेतला— या आजींच्या नात्यात मी आज त्यांचा माणूस आहे.
थोड्याच वेळात डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली. बाहेर उभं राहून देवाजवळ एकच प्रार्थना— “सगळं सुखरूप पार पडू दे.” आणि देवाने ऐकलंही. काही वेळाने दवाखान्यातून गोड बातमी आली— बाळाचा सुखरूप जन्म झाला!
त्या क्षणी आजींच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान… सांगता येणार नाही. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते, आणि माझ्या मनात मात्र माणुसकीवरील विश्वास आणखी दृढ होत होता.
बाळाच्या आईला वॉर्डमध्ये शिफ्ट करेपर्यंत मी दवाखान्यातच थांबलो. घड्याळाचे काटे रात्रीचे 1:30 वाजले तेव्हा मी निघालो. शरीर थकलेलं होतं, पण मन? मन मात्र अभूतपूर्व समाधानाने भरून गेलं होतं.
आणि त्या क्षणी एक गोष्ट जाणवली—
जगात समस्या जास्त नाहीत, माणसं कमी पडू नयेत एवढंच महत्वाचं आहे.
खास म्हणजे, या साऱ्या प्रक्रियेत दवाखान्यात आधीच सिझर झालेल्या एका पेशंटचे नातेवाईक खूप मदतीला धावून आले. कागदपत्रं, प्रक्रिया, धावपळ— त्यांनी सगळं मनापासून संभाळलं. आपली काही ओळख नव्हती, काही स्वार्थ नव्हता, ना काही अपेक्षा… फक्त एक माणूस दुसऱ्या माणसासाठी उभा राहिला होता.
आजच्या धावपळीच्या, स्वार्थी जगातही अशी माणसं भेटतात— तेव्हा दोन्ही हात जोडून मान खाली झुकते. आणि अंतर्मनात पुन्हा एकदा आवाज येतो—
“माणुसकी अजूनही जिवंत आहे…
आणि अशी माणसं जगात आहेत तोपर्यंत ती कायम जिवंत राहील.”
कारण एका बाळाच्या जन्मासोबत माणुसकीनंही काल नव्याने जन्म घेतला होता.
– सचिन दिलपाक यांच्या फेसबुक वॉलवरुन
शब्दांकन- प्रमोद राऊत

