धाराशिव/लोहारा : धाराशिव, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांच्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन १७ व १८ नोव्हेंबर २०२५ रोजी ज्ञानप्रबोधिनी हराळी येथे होणार आहे. या प्रदर्शनाच्या दुसऱ्या पूर्वतयारी बैठकीत आज शिक्षण क्षेत्रातील मान्यवर अधिकारी उपस्थित राहून तयारीचा आढावा घेतला आणि मार्गदर्शन केले.
बैठकीत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके यांनी प्रदर्शनाच्या आयोजनातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशील प्रयोगांचे महत्त्व यावर भर दिला. तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि पर्यावरणपूरक प्रकल्प सादर करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दत्तात्रय लांडगे, दिनकर होळकर यांनी जिल्हास्तरीय समन्वय आणि विद्यार्थ्यांच्या निवडीसंबंधी सूचना दिल्या. माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक पठाण यांनी तांत्रिक बाबी व आयोजनाच्या खर्च व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.
बैठकीस लोहारा गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, उमरगा गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी भारत देवगुडे, श्रीमती राऊत, हाके उपस्थित होते. सर्वांनी मिळून प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजनावर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत तीन जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.ज्ञानप्रबोधिनी हराळी येथे होणारे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारांना व नवोन्मेषी दृष्टीला चालना देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

