धाराशिव : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्याने तयारीला वेग आला असून, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) धाराशिव येथे ईव्हीएम मशीनचे फर्स्ट लेवल चेकिंग (FLC) प्रक्रिया सुरू आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिक तपासणीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला.

यावेळी सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी स्वाती शेंडे याही उपस्थित होत्या. त्यांनीही एफएलसीच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व अचूकता राखण्यासाठी ईव्हीएमची तपासणी ही महत्त्वाची पायरी असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रक्रियेची सविस्तर माहिती नायब तहसीलदार (निवडणूक) स्वामी जी.एस. यांनी जिल्हाधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. मशीनचे प्रत्येक तांत्रिक घटक तपासणे, त्रुटीविरहित कार्यप्रणाली सुनिश्चित करणे आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करणे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी यांनी एफएलसी केंद्राची पाहणी करताना प्रत्यक्ष मशीन तपासणीची स्थिती, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सुरक्षा व्यवस्था आणि नोंदी तपासल्या. निवडणूक प्रक्रियेतील कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी काटेकोर तयारी करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचे समजते.
ईव्हीएम चाचणीची प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार असून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आवश्यक सर्व मशीनची तपासणी टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एफएलसी हा निवडणूक प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, जिल्हा प्रशासनाने यासाठी विशेष दक्षता घेतल्याचे चित्र दिसून आले.

