धाराशिव: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘क्रांतीसूर्य’ म्हटले जाते, कारण त्यांचे कार्य अतुलनीय असून समाजहितासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य अर्पण केले,” असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास अण्णा कोळगे यांनी केले. जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे आयोजित महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्राचार्य जयप्रकाश कोळगे म्हणाले, “भारतीय संविधान निर्मितीत डॉ. आंबेडकरांनी निभावलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा त्यांचा मूलमंत्र असून उच्च शिक्षणाच्या माध्यमातून देशोन्नती साधण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी स्वीकारावे.”
सहशिक्षक मोहन चव्हाण यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनपटाचे प्रभावी सादरीकरण करून त्यांच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा वेध घेतला. “कष्टकरी आणि श्रमजीवी वर्गाचे ते खरे कैवारी होते. समाजात समता व बंधुता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे, माजी जि.प. सदस्य रामदास अण्णा कोळगे, माजी ग्रा.प. सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य संतोष कपाळे, मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सुत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले तर आभार गणेश शेटे यांनी मानले.

