धाराशिव : “प्रत्येक शाळेत बुद्धिबळ” या उपक्रमांतर्गत धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील प्रभाकर बोंदर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे दि. ४ नोव्हेंबर रोजी बुद्धिबळ संचांचे वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा फुलारी यांच्याकडे हे संच बेंबळी येथील वैद्यकीय प्रॅक्टिशनर डॉ. अविनाश गावडे आणि सा. बां. विभागातील सेवानिवृत्त अभियंता नंदकुमार सुरु यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमामागील उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाबद्दलची आवड निर्माण करणे आणि त्यांची बौद्धिक क्षमता वाढविणे हा आहे. बुद्धिबळ हा विचार, संयम आणि नियोजन शिकविणारा खेळ असल्याने तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, येत्या ७ डिसेंबर रोजी कै. गोपीनाथ मुंडे लोकनेते जयंतीनिमित्त प्रभाकर बोंदर विद्यालयात जिल्हास्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभाग घेणार असून, उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातही बुद्धिबळाची संस्कृती रुजविण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

