धाराशिव : धाराशिव जिल्ह्याचा एक सामान्य मुलगा… UPSCच्या सात प्रयत्नांचा प्रवास… वनसेवेतील अधिकारी म्हणून यशस्वी कारकीर्द… आणि आता थेट देशातील सर्वात लोकप्रिय क्विझ शो कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसण्याचा मान!
धाराशिवचे सुपुत्र अनिरुद्ध अनिल ढगे यांनी हे स्वप्न साकार केले असून, ते सहभागी असलेल्या भागाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटी हे मूळ गाव असलेले अनिरुद्ध ढगे सध्या चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सहाय्यक वनसंरक्षक (वर्ग-1 अधिकारी) म्हणून कार्यरत आहेत. UPSCची मुख्य परीक्षा तब्बल सात वेळा दिल्यानंतर त्यांनी राज्य लोकसेवा आयोगामार्फत मिळवलेली ही प्रशासकीय यशस्वी वाटचाल आता देशभर झळकणार आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या दमदार उपस्थितीत होणाऱ्या या क्विझ शोमध्ये स्पर्धक म्हणून निवड होणे हीच अनेकांची महत्त्वाकांक्षा. यंदाच्या वर्षी कार्यक्रमाचे रौप्य महोत्सवी (25 वर्षे पूर्ण) पर्व साजरे होत असताना अनिरुद्ध ढगे यांना हॉट सीटची संधी मिळणे हा धाराशिवसाठी मोठा सन्मान मानला जात आहे.
अनिरुद्ध सहभागी असलेले भाग सोमवार, 17 नोव्हेंबर आणि मंगळवार, 18 नोव्हेंबर, रोजी रात्री 9 वाजता सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहेत. त्यांच्या या यशानंतर जिल्हाभरातून आणि सोशल मीडियावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धाराशिवच्या मातीतील जिद्द, मेहनत आणि स्वप्नपूर्ती यांचे उत्तम उदाहरण म्हणून अनिरुद्ध ढगे यांचे नाव आता अभिमानाने घेतले जात आहे.

