उमरगा/धाराशिव (आकाश पोतदार) :
राज्य निवडणूक आयोग यांनी ४ नोव्हेंबर रोजी उमरगा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असून, दरम्यान काही जागांबाबतच्या अपीलांच्या निकालांमुळे तीन सदस्य पदांच्या जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
२९ नोव्हेंबर रोजी आयोगाकडून आलेल्या पत्रानुसार, प्रभाग क्र. ४ जागा (ब) – सर्वसाधारण, प्रभाग क्र. ५ जागा (अ) – ना.मा.प्र. (महिला), तसेच प्रभाग क्र. 11 जागा (अ) – अनुसूचित जाती या जागांबाबत दाखल अपीलांचा निकाल संबंधित अतिरिक्त जिल्हा न्यायालयाकडून २५ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला. हा निकाल मूळ कार्यक्रमानुसार २३ नोव्हेंबरपूर्वी न आल्याने, या जागांची निवडणूक ४ नोव्हेंबरच्या कार्यक्रमानुसार घेता येणार नाही.
या तीनही जागांसाठी आयोगाने परिशिष्ट-१ नुसार सुधारीत निवडणूक कार्यक्रम जारी केला असून या जागांची निवडणूक नव्या वेळापत्रकानुसार होणार आहे.
दरम्यान, अध्यक्ष आणि उर्वरित २२ सदस्यांची निवडणूक मात्र पूर्वी घोषित कार्यक्रमानुसारच होणार आहे. ४ नोव्हेंबरच्या कार्यक्रमाप्रमाणे २ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया होईल.
धाराशिव नगरपरिषद – स्थगित जागा : १. प्रभाग क्र.२ – जागा (अ), २. प्रभाग क्र.७ – जागा (ब), ३. प्रभाग क्र.१४ – जागा (ब), तर उमरगा नगरपरिषद – स्थगित जागा :१. प्रभाग क्र.४ – जागा (ब), २. प्रभाग क्र.५– जागा (अ), ३. प्रभाग क्र.११ – जागा (अ)
निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानंतर उमरग्यासह धाराशिव परिसरातील निवडणूक वातावरणाला नवा कल प्राप्त झाला असून, नागरिकांचे व पक्षीय संघटनांचे लक्ष आता नव्या तारखांकडे लागले आहे.
