धाराशिव : राज्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सततच्या पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचले, त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला, पिकांची वाढ खुंटली आणि मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घटले.
या परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाल्याने त्यांच्या हातात उत्पन्नही घटले आहे. नुकसानभरपाईची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने दिवाळीचा खर्च भागवण्यासाठी आणि मजुरांचे पैसे देण्यासाठी अनेकांना खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे. मात्र बाजारात व्यापारी फक्त ३००० ते ३५०० रुपयांदरम्यान सोयाबीन खरेदी करत आहेत, तर शासनाने जाहीर केलेला हमीभाव ५३२८ रुपये प्रति क्विंटल आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल सुमारे १५०० रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या “भावांतर योजने”ची अंमलबजावणी करून, हमीभावापेक्षा कमी दराने पिके विकणाऱ्या शेतकऱ्यांना विक्री किंमत व हमीभाव यातील फरकाची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी कृषी संघटनांकडून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने तातडीने हमीभाव केंद्रे सुरू करून भावांतर योजनेची अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा सूर राज्यभर उमटत आहे.

