धाराशिव : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील #नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि पात्र उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचा राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ७० टक्के तर जिल्ह्याबाहेरील ३० टक्के जागा राखीव असणार आहेत. अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. याबाबतचा #शासननिर्णय निर्गमित झाला आहे.
राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या स्तरावर पूर्वी तयार केलेली भरती संस्थांची तालिका (पॅनल) रद्द करण्यात आली असून, यापुढे बँकांच्या नोकरभरतीसाठी IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन), TCS-ION (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) किंवा MKCL (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.) यांपैकी कोणत्याही एका संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयानुसार, निवड केलेल्या संस्थेला भरती प्रक्रिया इतर कोणत्याही संस्थेकडे सोपविण्याची परवानगी राहणार नाही. यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि तांत्रिक दृष्ट्या सुरक्षित होणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
याशिवाय, सरकारने स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र त्या-त्या जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने, त्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी उमेदवारांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. उर्वरित ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या राहतील. तथापि, जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यास त्या जागा स्थानिक उमेदवारांकडून भरता येतील.
हा निर्णय केवळ आगामी भरती प्रक्रियेलाच नव्हे, तर या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीच पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेल्या बँकांनाही लागू राहणार आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, या निर्णयाद्वारे भरती संस्थांची तालिका तयार करण्याबाबतचे पूर्वीचे आदेश रद्द होत असले, तरी शासन आदेश दिनांक १५ जून २०१८ आणि शासन निर्णय दिनांक २३ जून २०२२ मधील इतर सर्व तरतुदी पूर्ववत लागू राहणार असून या नव्या नियमांमुळे जिल्हा बँकांमधील भरती प्रक्रिया पारदर्शक होऊन स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधींमध्ये प्राधान्य मिळणार आहे.

