धाराशिव : भरदिवसा व्यावसायिकाला लुटणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत गजाआड केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी व्यावसायिकावर झालेल्या लुटीप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 406/2025, कलम 304, 3(5) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. त्यानुसार पथकाने तुळजापूर येथून मनोज उर्फ पापा महादेव धोत्रे (वय 30, रा. वेताळनगर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सदर गुन्हा आपल्या साथीदारासोबत केल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल, एक रेडमी कंपनीचा मोबाईल हस्तगत केला आहे. सदर आरोपीस पुढील तपासासाठी तुळजापूर पोलिस ठाण्यात रिपोर्टसह हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार राहुल नाईकवाडी, समाधान वाघमारे, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, चालक विनायक दहिहांडे, योगेश कोळी, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोअं सुर्यवंशी व भोसले यांच्या पथकाने केली आहे.

