धाराशिव:भुम तालुक्यातील चिंचपुर ढगे येथे पाच महिन्यांच्या गर्भवतीवर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी एका डॉक्टरविरुद्ध भुम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. नंदकुमार रामलिंगप्पा स्वामी (वय ५७, रा. चिंचपुर ढगे, ता. भुम, जि. धाराशिव, ह.मु. दत्तनगर, बार्शी, जि. सोलापूर) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. फिर्यादी सविता संतोष बनसोडे (वय २५, रा. विजोरा, ता. वाशी, जि. धाराशिव) या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या.
दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसात ते दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान चिंचपुर ढगे येथे डॉ. स्वामी यांच्या शेतात हा प्रकार घडला. आरोपी डॉक्टरांनी फिर्यादी सविता यांना गाडीत झोपवून तपासणीच्या नावाखाली मशिनद्वारे तपास केला. त्यानंतर त्या गर्भवती असल्याचे माहीत असतानाही त्यांना गर्भपातासाठी गोळी खाण्यास दिली.
गोळी घेतल्यानंतर सविता यांच्या पोटात तीव्र वेदना होऊन त्यांचा गर्भपात झाला. त्यानंतर फिर्यादींच्या पतीने गर्भपात झालेल्या अर्भकाला डॉ. स्वामी यांच्या शेतात पुरल्याची माहिती मिळाली. अर्भक शेतात का पुरले, असा सवाल उपस्थित करत पतीने मारहाण केल्याचेही फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी सविता बनसोडे यांनी दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी भुम पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहितेचे कलम ८९, २३८, तसेच कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास भुम पोलिसांकडून सुरू असून, वैद्यकीय व्यावसायिकांनी अशा अमानुष कृत्यात सहभागी झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
