धाराशिव : सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा डेटा शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम धाराशिव तहसील कार्यालयात युद्धपातळीवर सुरू आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही कर्मचारी वर्ग अहोरात्र मेहनत घेऊन शेतकऱ्यांना शासकीय मदत तातडीने मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. धाराशिव तालुक्यातील सुमारे 70 टक्के अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांचा डेटा दोन दिवसांतच शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या, उर्वरित शेतकऱ्यांचे माहिती संकलन आणि डेटा अपलोड करण्याचे काम पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती वेळेत उपलब्ध करून देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. जाधव यांनी केले आहे. तसेच ॲग्री स्टॅकवरील दैनंदिन मंजुरी (approval) प्रलंबित राहू नयेत म्हणून संबंधित कर्मचारी रोजच्या रोज लॉगिनवरील नोंदी क्लियर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्री स्टॅक नोंदणी केली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले. धाराशिव तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अतिवृष्टी अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असून, कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा मोबाईल क्रमांक 9657576714 वर संदेश पाठवावा, असे आवाहन डॉ. मृणाल जाधव यांनी केले आहे.

