धाराशिव : केंद्र शासनाने सन २०२७ पर्यंत देशभरातील कुष्ठरोगाचा प्रसार ‘शून्यावर’ आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.या अनुषंगाने समाजात लपून राहिलेल्या नव्या कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना बहुविध औषधोपचार (एम.डी.टी.) सुरू करणे आणि रोगप्रसाराची साखळी खंडित करणे हा एकमेव प्रभावी पर्याय असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
या उद्देशाने जिल्ह्यात दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘कुष्ठरोग शोध अभियान’ राबविण्यात येणार आहे.या मोहिमेत आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या व प्रशिक्षित पुरुष स्वयंसेवक यांच्या सहकार्याने ग्रामीण भागात संपूर्ण लोकसंख्येचे तसेच शहरी भागातील अतिजोखमीच्या क्षेत्रांतील घराघरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबातील स्त्रियांची तपासणी आशा कार्यकर्त्या तर पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवक करतील.या तपासणीदरम्यान आढळणाऱ्या संशयित रुग्णांची नोंद घेण्यात येईल. त्यानंतर उपकेंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामिण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालयस्तरावर वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयस्तरावर त्वचारोग तज्ञ यांच्यामार्फत संशयितांची तपासणी करून रोगनिदान निश्चित करण्यात येईल. निदान झालेल्या सर्व नव्या रुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येतील.
लवकर निदान आणि नियमित पूर्ण उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो,असे वैद्यकीय अधिष्ठात्यांनी सांगितले.या मोहिमेचे प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुकास्तरावर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी,पंचायत समिती यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.या समित्यांच्या बैठका घेऊन अभियानाची कार्यवाही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
संपूर्ण जिल्ह्यात ३ लक्ष ९ हजार ५०० घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून,१५ लक्ष ४७ हजार ५०१ लोकसंख्येची प्रत्यक्ष तपासणी होणार आहे.यासाठी १,२०२ सर्वेक्षण पथके तयार करण्यात आली आहे. त्यांचे पर्यवेक्षण २४० पर्यवेक्षकांमार्फत केले जाणार आहे.प्रत्येक पथक ग्रामीण भागात दररोज २० ते २५ आणि शहरी भागात ३० घरांचे सर्वेक्षण करेल.या मोहिमेच्या कालावधीत जिल्हास्तर,विभागीय आणि राज्यस्तरावरील अधिकारी/कर्मचारी जिल्ह्याला भेट देऊन अभियानाची पाहणी करतील.
कुष्ठरोगाची संशयास्पद लक्षणे :
१) त्वचेवर फिकट किंवा लालसर बधिर चट्टा,ज्यावर घाम येत नाही आणि थंड-गरम संवेदना जाणवत नाहीत.
२) जाड व दुखणाऱ्या मज्जातंतू (नसा).
३) त्वचेवर गाठी असणे.
४) तेलकट व बकाकणारी त्वचा.
५) स्नायूंच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे,डोळे पूर्णपणे बंद न होणे.
६) हातापायाला मुंग्या येणे, तळहात/पाय बधिर होणे अथवा जखमा होणे.
७) हातापायांची बोटे वाकडी होणे, हात मनगटापासून किंवा पाय पोटऱ्यांपासून लुळा पडणे.
८) हात व पायात अशक्तपणा जाणवणे,हातातून वस्तू गळून पडणे,चालताना चप्पल गळून पडणे ही लक्षणे आढळल्यास आपल्या घरी येणाऱ्या सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना दाखवून तपासणी करून घ्यावी.
“आपल्याला कुष्ठरोग तर नाही ना” याची खात्री करून घ्यावी आणि आपला जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय, धाराशिव,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद धाराशिव आणि सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), धाराशिव यांनी केले आहे.
