धाराशिव :“अचानक उठायचं आणि अमुक-अमुक कोटींचा भ्रष्टाचार झाला म्हणायचं… पण चार वर्ष भाजपचे नेते झोपले होते का?” असा थेट सवाल करत जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जाधवर म्हणाले, “डिसेंबर 2021 पर्यंत आम्ही भाजपसोबत सत्तेत होतो. तेव्हा जर एवढा भ्रष्टाचार चालू होता, तर ते आमच्यासोबत कशासाठी राहिले? स्वाभिमानाने सत्ता सोडून बाहेर पडायला पाहिजे होतं. तेव्हाच तक्रारी करून चौकशीची मागणी केली असती, तर जनतेला विश्वास तरी बसला असता.”
उपनगराध्यक्ष कोण होते, हे शहरातील प्रत्येकाला ठाऊक असून “बुद्धीभेद कसा करावा हे भाजपकडूनच शिकावं” असा टोला त्यांनी लगावला. लेखापरीक्षण अहवाल दाखवताना प्रशासनाने दिलेलं उत्तर लपवण्यात भाजपची भूमिका संशयास्पद असल्याचाही आरोप त्यांनी केला. “थोडा अभ्यास कमी पडला की जुन्या भाजपवाल्यांना तोंडावर पाडण्यासाठी हा डाव?” असा चिमटा जाधवर यांनी काढला.
“जर भ्रष्टाचार एवढा मोठा असता, तर विधायक राणा पाटील यांनीच पत्रकार परिषद घेऊन आरोप मांडले असते. आपल्या मित्र दत्ता कुलकर्णी यांनी तरी याचा विचार करायला हवा होता,” असे मत व्यक्त करत जाधवर यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगत असून, यामुळे धाराशिवच्या राजकीय वातावरणात चांगलाच तापমাত্রा वाढल्याचे चित्र आहे.

