धाराशिव : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता व वेळेचे भान राखत जबाबदारी पार पाडण्यासाठी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद नाट्यगृह येथे पार पडले.
या प्रशिक्षणात एकूण ७५० अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते, तर ३९ अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर आली. प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली झाले.
मुख्य प्रशिक्षण देतांना अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी मतदान प्रक्रिया, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट हाताळणी, मतदान केंद्रावरील शिस्त, दिव्यांग व वरिष्ठ नागरिक मतदार सुविधा, निवडणूक आचारसंहिता पालन, तसेच आपत्कालीन स्थितीतील उपाययोजना अशा सर्व निवडणूक विषयक बाबींवर सविस्तर माहिती दिली. मतदान केंद्रावरील प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी ही निवडणुकीच्या यशस्वी पार पाडण्यात अत्यंत महत्त्वाची असल्याचा संदेश त्यांनी दिला.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी नीता अंधारे तसेच नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
निवडणुकीच्या पारदर्शक व निर्भेळ अंमलबजावणीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पूर्ण दक्षतेने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


