धाराशिव : पशुपालन व्यवसायाला आता कृषी व्यवसायाचा समकक्ष दर्जा देण्यात आला असून,या निर्णयामुळे लघु आणि मध्यम स्वरूपाच्या पशुपालकांना कृषीच्या धर्तीवर विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे.या निर्णयामुळे पशुपालकांच्या उत्पादन खर्चात घट होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या निर्णयासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.परिणामी शासनाने पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा मंजूर केला आहे. या अंतर्गत पशुपालकांना वीज सवलत,ग्रामपंचायत करातील सवलत,तसेच कर्जावरील व्याज सवलत मिळणार आहे.
या निर्णयामुळे पशुपालकांच्या खर्चात बचत होऊन त्यांना आर्थिक दिलासा मिळेल,असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी सांगितले.तसेच वीजदरातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी पात्र पशुपालकांनी महावितरण कार्यालयाशी व पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पशुपालन युनिट्सना मिळणार वीजदर सवलतीचा लाभ :
२५ हजार किंवा त्यापेक्षा कमी मांसल कुक्कुट पक्षी,५० हजार किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादन करणारे पक्षी,४५ हजार क्षमतेपर्यंत हॅचरी युनिट, १०० किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा.५०० किंवा त्यापेक्षा कमी शेळ्या/मेंढ्या असलेला गोठा.२०० किंवा त्यापेक्षा कमी वराहपालन युनिट,पशुपालन प्रकल्पातील पशुगृह,चारा/पशुखाद्य निर्मिती केंद्र,पाण्याची यंत्रणा,प्रक्रिया केंद्र,कोल्ड स्टोरेज व शीतसाखळी यंत्रणा.
वरील सर्व युनिट्ससाठी सवलतीच्या दरात वीज वापरण्याची परवानगी दिली जाणार आहे.पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी दर्जा लागू झाल्याने ग्रामीण भागातील पशुपालकांना आर्थिक बळकटी मिळेल व पशुधन विकासाला नवी दिशा मिळेल,असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
वीज सवलत मिळविण्यासाठी आवश्यक अटी : पशुपालकांनी जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन) कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक.सर्व पशुधनाची नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर करणे आवश्यक.वीज वितरण कंपनीमार्फत स्वतंत्र मीटर बसविणे आवश्यक आहे.
नवीन लाभार्थी पशुपालकांनी वीज जोडणीसाठी संबंधित उपअभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.सादर केलेल्या अर्जाची प्रत तालुका सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना देणे आवश्यक आहे,असे डॉ.मनोज घाटे (जिल्हा उपआयुक्त,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) आणि डॉ.मुकुंद तावरे (सहाय्यक आयुक्त,पशुसंवर्धन) यांनी सांगितले आहे.
