धाराशिव (प्रमोद राऊत) : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग धाराशिवचे शिक्षण विस्ताराधिकारी बालाजी यरमुनवाड यांची नुकतीच पदोन्नती होऊन त्यांची बदली विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे शिक्षण उपनिरीक्षक म्हणून झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीनिमित्त महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ शाखेच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास राज्य उपाध्यक्ष बालाजी तांबे, जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे, उपाध्यक्ष संभाजी गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष तुळशीदास पिसे, मुख्याध्यापक राजेंद्र मडके, सचिनानंद लोमटे, राजाभाऊ आगळे, सहशिक्षक नितीन आडसकर, लिपिक सतीश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षणाधिकारी सुधा साळुंके, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे, दिनकर होळकर, जिल्हा विज्ञान समन्वयक ताहेर काजी, तसेच शिक्षण विस्ताराधिकारी संतोष माळी यांनी विशेष उपस्थिती दर्शवून अभिनंदन केले.
सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना बालाजी यरमुनवाड यांच्या कार्यतत्परतेचा, संघटनशीलतेचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिनानंद लोमटे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजाभाऊ आगळे यांनी केले.

