धाराशिव : येथील महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. स्मिता ए. सरोदे यांना ANBAI महाराष्ट्र चॅप्टरतर्फे “सर्वोत्तम अध्यापन विद्याशाखा” हा प्रतिष्ठित पुरस्कार देवून गौरविण्यात आले. स्त्रीरोगशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान, अध्यापनातील नवनवीन पद्धतींचा अवलंब, तसेच वैद्यकीय नैतिकतेची जाण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे.
डॉ. सरोदे यांनी अनेक वर्षांपासून महिला आरोग्यविषयक संशोधन, प्रशिक्षण आणि सेवा कार्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय सहकाऱ्यांसह हितचिंतकांनी त्यांच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

